छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जमिनीच्या वादातून तरुणाचे अपहरण करून त्याचे पोट फाडणार्या कुख्यात बबला टोळीतील सदस्य आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शेख अमजद असद ऊर्फ मोहसीन (४५, रा. जहांगीर कॉलनी) याने रविवारी (दि.८) दुपारी एकच्या सुमारास हर्सूलच्या खुल्या कारागृहातून पलायन केले.
शेख अमजद असद याला अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात २०१८ मध्ये अटक झाली होती. तो २०२० पर्यंत कारागृहात होता. जुलै २०२४ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली. त्याला अमरावती हर्सूल कारागृहात स्थलांतरित करण्यात आले होते. चांगल्या वर्तणुकीमुळे त्यास खुल्या कारागृहात ठेवण्यात आले. त्याच्याकडे सफाईचे काम होते. रविवारी दुपारी त्याचा अन्य कैद्याशी वाद झाला. त्यानंतर त्याने खुल्या कारागृहातून दुपारी १ वाजेच्या सुमारास पलायन केले. ही बाब कारागृहातील अधिकार्यांच्या निदर्शनास येताच त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान, जब्बार यांची दौलताबाद परिसरात हत्या करून बबलाने जब्बार यांचे पोट फाडून मृताचे अवयव काढल्याने बबला नरभक्षक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जब्बार यांच्या पोटात दगड टाकून तो मृतदेह पाण्यात फेकला होता.











